समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता.
यात बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 9 जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. रात्रीच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 वर अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आणि अनेक प्रवासीही जखमी झाले. समृद्धी महामार्गावर प्रवास करताना घ्या ही काळजी – गेल्या अनेक महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
या महामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणून या महामार्गावर प्रवास करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. लांबचा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी आधी टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. वाहनाचे अलायमेंटसुद्धा नीट तपासले पाहिजे. अन्यथा त्याचा परिणाम टायर आणि इंजिनवर होतो.
वाहन चालवताना 100 ते 150 किलोमीटरमध्ये 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा, असेही तज्ञ सांगतात. समृध्दी महामार्गावर प्रवास करायचा असेल तर आता वाहनांचे टायर चांगले असण्याची गरज आहे. नागरिक प्रवासापूर्वी वाहनातील टायरमध्ये साधी हवा भरतात. टायरच्या हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन, 21 टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का इतर वायू असतो.
तर वाहनांमध्ये किमान 32 ते 33 बार हवा भरली जाते. मात्र, वाहन अधिक वेळ चालविल्यामुळे टायरमधील हवा पसरते. त्यामुळे टायरमध्ये भरलेली हवा ही 45 ते 50 पर्यंत पोहोचते. म्हणून टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो वाहन चालकांनी नायट्रोजनची हवा भरावी.