महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळणार, युवकांसाठीही योजना; राहुल गांधींची सोलापूरमध्ये घोषणा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांकडून जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापूरमध्ये होते.

आयोजित प्रचारसभेमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच महिला आणि युवकांसाठी थेट रक्कम देणारी योजना जाहीर केली.

राहुल गांधी म्हणाले की, जेवढा जीएसटी तुम्ही भरता तेवढाच अदानीदेखील भरतात. तरीही सरकारकडून त्यांना अधिकची मुभा दिली जाते. देशामध्ये १ टक्के लोकांकडे ४० टक्के मालमत्ता आहे. भाजप सरकारने देशात २०-२५ अरबपती बनवले आहेत. मात्र आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत.

नेमकं राहुल गांधी काय म्हणाले?

योजनेची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की, सध्याच्या घडीला स्त्री-पुरुष दोघेही जॉब करतात. स्त्रीया घरचं सगळं काम करुन, मुलांचं सगळं बघून कामाला जातात. त्यासाठी त्या वेगळा मोबदला मागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्त्रीयांसाठी महालक्ष्मी योजना आणणार आहोत.

महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाईल. यामध्ये सगळ्या जाती, धर्मातील महिलांच्या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश केला जाईल. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक.. कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल. महिन्याला ८ हजार ५०० रुपये मिळतील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.