जळगाव : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचार्याचा मोबाईलमध्ये फोटो काढून शिविगाळ करीत विनयभंग करण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने पाळधी येथील 51 वर्षीय संशयीतास चांगलेच चोपून काढले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता नेरी नाका परीसरात घडली. या घटनेनंतर काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला अटक केली.
महिला कर्मचार्याचा विनयभंग
जळगाव शहर वाहतूक पोलिसात कार्यरत महिला कर्मचारी नेरी नाक्यावर कर्तव्यावर असताना संशयीत आरोपी सलीमखान अरमानखान पठाण (पाळधी, साठघर मोहल्ला, ता.धरणगाव) याने एका महिला कर्मचार्याचे नाव घेवून त्यांचा मोबाईल क्रमांक मागितला व तो न दिल्याने संशयीताने आरडा-ओरड करीत मोबाईलमध्ये कर्तव्यावरील महिला कर्मचार्याचा फोटो काढून आपण रीपोर्टर असल्याचेही सांगितले व महिलेशी अरेरावी करीत नोकरी घालवेल, अशी धमकी देवून ओढाताण करीत महिला कर्मचार्याचा विनयभंग केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिला कर्मचार्याने वरीष्ठांना व सहकार्यांना हा प्रकार कळल्यानंतर पोलिस यंत्रणा दाखल झाली.
संतप्त जमावाने आरोपीस चोपले
शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचार्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठा जमाव जमला व जमावाने अनेकांनी संशयीत आरोपी सलीम खान यास चोपून काढले. या प्रकारानंतर नेरी नाका परीसरात काहीसे तणावाचे वातावरण होते मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेवून परीस्थिती नियंत्रणात आणली.