कुठे बहिष्कार तर कुठे गर्दी, महाराष्ट्रात 1 वाजेपर्यंत किती झालं मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सकाळी 7 वाजेपासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण 8 मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.7 टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा -32.32 टक्के

अकोला – 32.25 टक्के

अमरावती – 31.40 टक्के

बुलढाणा 29.07 टक्के

हिंगोली – 30.46 टक्के

नांदेड – 32.93 टक्के

परभणी -33.88 टक्के

यवतमाळ – वाशिम -31.47 टक्के

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांसाठी मतदान पार पडत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात विदर्भात 5 आणि मराठवाड्यात 3 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात एकूण 204 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण 16 हजार 589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.आठही लोकसभा मतदारसंघांत 10 वर्षांत प्रत्येकी दोन ते सव्वा दोन लाख मतदार वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अमरावतीमध्ये 37 उमेदवार आहेत. त्याखालोखाल परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्धामध्ये 24, नांदेडमध्ये 23, बुलढाणामध्ये 21, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात 17 आणि अकोलामध्ये 15 उमेदवार आहेत. 8 पैकी 3 जागांवर शिवसेना आणि उबाठा गटामध्ये थेट लढत होणार आहे.

कुणाचा सामना कुणाशी?

बुलढाणा

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची उबाठा गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याशी थेट लढत होणार आहे. याशिवाय शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांच्यामुळं लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे, याशिवाय वंचितचे वसंत मगर यांच्यामुळं आणखी चुरस वाढणार आहे.

अकोला

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे.

अमरावती

अमरावतीत भाजपाचे उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे लढत आहेत. तर दिनेश बुब हे विधानसभेत दोन आमदार असलेल्या सत्ताधारी आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक तिरंगी असणार आहे.

वर्धा

वर्ध्यात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

यवतमाळ-वाशिम

यवतमाळ-वाशिममध्ये हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील आणि उबाठा गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.

हिंगोली

हिंगोलीमध्ये उबाठा उमेदवार नागेश आष्टीकर, शिवसेनेचे बाबुराव कोहळीकर यांच्यात थेट लढत आहे. या मतदारसंघांत शिवसेनेने आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपराही हिंगोली मतदारसंघाने यंदाही जपली आहे.

नांदेड

नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांची काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्याशी थेट लढत होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आला. काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

परभणी

परभणी मतदारसंघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे. परभणी मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीने या मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे.