बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात जल्लोष सुरू होता. हा विजयी सोहळा पार पडल्यानंतर त्याच रात्री विराट कोहली लंडनला रवाना झाला होता. सध्या तो पत्नी अनुष्का आणि त्याच्या दोन मुलांसह लंडनमध्ये मजा करत आहे. मात्र विराट अडचणीच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहलीच्या बंगळुरूमधील वन8 कम्युन पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेटपटू विराट कोहलीने बंगळुरू मध्ये One8 कम्युन पब सुरू केले आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता, गुरुग्राम या शहरांमध्ये त्याच्या शाखा आहेत. मात्र बेंगळुरूमधील शाखेवर पोलिसांनी बंद होण्याच्या वेळेबाबत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. कस्तुरबा रोडवर असलेला One8 कम्युन पब ६ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजे पर्यंत हा पब ग्राहकांसाठी सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना वन8 कम्युन पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी कथित पबवर धाड घातली. यावेळी रात्री दीड वाजता पब सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे वेळेचे उल्लघन केल्याप्रकरणी या पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, वन8 कम्युन पबकडून या कारवाईबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.