ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचाला प्रवेशबंंदी; ग्रा.पं.कर्मचार्‍याचा प्रताप

जळगाव – तिरोडा दि.०९- तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयातील पदसिध्द पदाधिकारी तथा संवैधानिक पदावर असलेल्या उपसरपंचाला ग्राम पंचायत कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले. सरपंचाच्या आदेशान्वये ग्राम पंचायत कर्मचार्‍यांकडून उपसरपंचाला मज्जाव घातला जात आहे. हा प्रकार तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव येथे उपसरपंच असलेले शुभम नरेंद्र भैसारे यांना कोणत्या कारणाने ग्राम पंचायत कार्यालयात पायबंद घालण्यात आले, हे स्पष्ट नसले तरी सरपंचाचा मनमानी कारभार मात्र समोर आला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना तक्रार करण्यात आली असून सरपंचावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी भैसारे यांनी केली आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत डोंगरगाव येथे ग्रा.पं.सदस्य तथा उपसरपंच पदावर शुभम नरेंद्र भैसारे हे विराजमान आहेत. ते अनुसूचित जाती प्रवर्गातून येत असून दिव्यांग आहेत. लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने त्यांना प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. संवैधानिक व्यवस्थेत पदसिध्द पदाधिकारी असून त्यांना काही अधिकार मिळाले आहेत. परंतु, सरपंच आपल्या मनमानी कारभाराचा परिचय देत त्यांना त्यापासून वंचित ठेवत आहे. भैसारे हे ३ जुलै रोजी ग्राम पंचायत कार्यालयात गेले असता त्यांचा मज्जाव करून त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात आले नाही. ग्राम पंचायत कर्मचार्‍याने त्यांची अडवणूक करून कार्यालयाचे दार बंद करीत त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. यावर भैसारे यांनी विचारणा केली असता अरेरावी करून मला सरपंचाने आदेश दिला आहे, असे सांगितले. त्यामुळे सरपंच कोणत्या कारणाने उपसरपंचावर प्रवेशबंदी लादत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. अशाप्रकारे एका पदसिध्द पदाधिकार्‍याला त्याच्या अधिकार व कर्तव्यापासून दूर ठेवणे, हे कायद्याचा अपमान आहे.

त्यामुळे त्या सरपंचावर अपात्रतेची कार्यवाही करून पदमुक्त करण्यात यावे तसेच ग्रा.पं.कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिडीत उपसरपंच शुभम नरेंद्र भैसारे यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ कोणती भुमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

सरपंच यांच्याकडून उपसरपंचावर कागदपत्र चोरीचा आरोप लावून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय दस्तऐवज पूर्णपणे ग्रामसेवकाकडे सुरक्षित असतात. त्यामुळे ग्रा.प.दस्ताऐवज चोरीला जाण्याचे भागच येत नाही. जर असे झालेही तर त्याची तक्रार ग्रामसेवकाकडून पोलिस ठाण्यात करण्यात येणार. पण सरपंच फक्त आकसापोटी बदनाम करून ग्राम पंचायत कार्यालयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा, चोरीत सहभागाची तक्रार अथवा नोंद नाही. त्यामुळे कशावरून माझ्यावर आरोप केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला डावलन्यासाठीच सरपंच आणि चपराशी खटाटोप करीत आहेत, असे भैसारे यांनी व्यक्त केले. उपसरपंच या महत्वाच्या पदावर असूनही मला विचारात न घेता मनमर्जीने कामकाज सुरू आहे. एवढेच नाही तर आयोजित सभेची नोटीस किंवा सुचना मला वेळेवर दिली जाते. सभेत आपले मत मांडायला गेलो तर तू बोलू नको, तु आपले कानून-कायदे आपल्या जवळ ठेव, असे बोलून मानसिक त्रास देत आहेत. प्रत्येक बाबतीत विरोधात्मक भुमिका घेवून माझी पिवळणूक केली जात आहे, असाही आरोप उपसरपंच भैसारे यांनी केला आहे.