पतंजली टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थांचा वापर, कंपनीला कायदेशीर नोटीस

आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जिन्नसांनी औषधनिर्मितीचा दावा करणाऱ्या पंतजली या कंपनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारदाराचा दावा आहे की, कंपनीने पतंजली दिव्य दंत मंजन या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थांचा वापर केला आहे. या टूथपेस्टवर हिरव्या ठिपक्याचं लेबल लावण्यात येतं. हे हिरवं लेबल फक्त शुद्ध शाकाहारी पदार्थांसाठी वापरण्यात येत.

शाशा जैन यांनी पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवून कंपनीने शाकाहारी उत्पादनांमध्ये मांसाहारी पदार्थांचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवर याबाबत ट्वीट करून शाशा यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी पदार्थ वापरत असल्याचा दावा करते. पण, या कंपनीच्या दिव्य दंत मंजन या टूथपेस्टमध्ये कटलफिश या समुद्री जिवाचा वापर केला गेला आहे.’

‘ही कंपनी ग्रीन लेबल लावून आपली उत्पादनं विकते. त्यामुळे जर असं असेल तर हे ग्राहकांच्या अधिकारांचं हनन आहे. तसंच, ही पतंजलीवर विश्वास टाकून त्यांची उत्पादनं वापरणाऱ्यांचीही फसवणूक आहे. त्यासाठी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं असल्याचं जैन यांचं म्हणणं आहे.