तुम्हाला जे काही करायचे ते तुमच्या घरासमोर जाऊन करा ना बाबानो, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दांपत्याला दिला आहे. तुमच्या घरात करा, मंदिरात जाऊन करा. कुणालाच काही विरोध असण्याचे कारण नाही. पण ‘मातोश्री’वर जाणे सोपे नाही असे सगळे सांगत असताना तुमचा एवढा अट्टाहास का, असा सवालही त्यांनी राणा यांना विचारला.
तुम्ही अमरावतीचे, वडनाऱयाचे लोकप्रतिनिधी असताना ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असे वक्तव्य राणा दांपत्याने का केले? त्या वक्तव्याने नवीन प्रश्न निर्माण होणार हे दिसत होते.
भावना तीव्र झाल्याने शिवसैनिक राणांच्या घराबाहेर गेले. पोलिसांनी नियमानुसार कायदेशीर कारवाई केली आहे. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. कुणीही कुणाला उचकवण्याचा प्रयत्न करू नये. तणावाची परिस्थिती पाहून किरीट सोमय्यांनी पोलीस ठाण्यात जायला नको होते, असेही अजित पवार म्हणाले.
राणा दांपत्याच्या कृतीमागे कुठला तरी हात
नवनीत राणा आणि रवी राणा दांपत्याने जी कृती केली त्यामागे नक्कीच कुठला तरी हात आहे, त्याशिवाय ते एवढं धाडस करू शकत नाहीत. यामागे कोण आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून ते अस्थिर करण्याचे, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे वेगवेगळे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. कालची घटना हा त्याचाच एक भाग आहे. राणा दाम्पत्यावर पोलिसांनी नियमानुसार योग्य कारवाई केली आहे. पोलीस कोठडीत असलेल्यांना भेटण्याची परवानगी ही फक्त त्यांचे नातेवाईक व वकील यांनाच असते. किरीट सोमय्या यांनी तेथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढविण्याचे काम केले. त्यांनी असं कोणतं कृत्य केलं की त्यापासून त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला अन् त्यांना झेड सिक्युरिटी द्यावी लागली, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
16 शिवसैनिकांना अटक व सुटका
राणा यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खार पोलिसांनी तपास करून 16 शिवसैनिकांना अटक केली. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
खार येथे वाहनावर दगड लागल्याने किरकोळ जखमी झालेल्या सोमय्यांनी आज वांद्रे पोलीस ठाणे गाठले. शिवसैनिकांनी आपल्यावर वाहनावर 100 दगड भिरकावले, त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा असे सोमय्या पोलिसांना सांगत होते. अखेर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे वर्ग केला आहे.