आता तहसील कार्यालयातच होणार जन्म, मृत्यू नोंदीची पडताळणी; न्यायालयात जाण्याची गरज नाही

जळगाव – जन्म व मृत्यूची नोंद, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अनेकदा माहितीअभावी किंवा नजरचुकीने नोंदणी करण्याचे राहून गेल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शैक्षणिक किंवा इतर कामांसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी या नोंदीची आवश्‍यकता असते.

मग त्यासाठी न्यायालयात सर्व पुरावे सादर करून नोंदीची प्रक्रिया पार पाडली जाते. यात बराच कालावधी जातो. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेळ, श्रम, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्चाचा भुर्दंड बसतो. पण आता नागरिकांना न्यायालयात जाण्याची गरज नाही.

कारण आता शासन निर्णयानुसार जन्म व मृत्यूच्या उशिरा झालेल्या नोंदीची पडताळणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे तत्काळ उपलब्ध होणार आहेत.

शासनाने जन्म मृत्यूची नोंद विधी व न्याय विभाग यांच्याकडे दिली होती. मात्र, न्याय विभागाची दैनंदिन कामे लक्षात घेता भारत सरकार यांच्याकडील विधी व न्याय विभाग नवी दिल्ली यांनी ११ ऑगस्ट २०२३ च्या पत्रान्वये राजपत्र जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम २०२३ अंतर्गत यापुढे उशिराने जन्म -मृत्यूची नोंद व त्याचे दाखले न्यायालयाऐवजी तहसील कार्यालयात मिळणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले.

त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २० सप्टेंबर २०२३ च्या पत्रान्वये जन्म आणि मृत्यू अधिनियम १३ मध्ये निबंधकास जन्म आणि मृत्यू यांची तीन महिन्यानंतर उशिरा झालेल्या नोंदीबाबतची माहिती एक वर्षानंतर दिली जाते.

अशा जन्म आणि मृत्यू यांची नोंदणी पडताळणी करण्याबाबत जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे सुचित केल्यानुसार यापुढे आता न्यायालयाऐवजी तहसील कार्यालयात जन्म आणि मृत्यूची नोंद व दाखले मिळणार आहेत.

जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा

ग्रामीण भागासह शहरी भागात बऱ्याचदा शिक्षणाचा अभाव किंवा हलगर्जीपणामुळे जन्म व मृत्यूची नोंद वेळेवर केली जात नाही. जेव्हा तहान लागते तेव्हा आपण विहीर खोदतो. या म्हणीनुसार व्यक्तीला जेव्हा गरज पडते तेव्हा तो त्या गोष्टीचा विचार करतो.

मात्र असे न करता ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यू झाला, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी जन्म व मृत्यूची नोंद वेळेवर केली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या या निर्माण होणार नाहीत. यासाठी जन्म व मृत्यूचे नोंद वेळेवर करणे गरजेचे आहे.

“जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयात जन्म व मृत्यूची नोंद करण्याबाबत पत्र मिळाले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच योग्य कागदपत्रांची पडताळणी करून उशिराने दाखल झालेल्या जन्म व मृत्यूची नोंद करून लवकरात लवकर दाखले देण्यासाठी प्रयत्नशील राहू.”