बनावट जन्मदाखला प्रकरणी मुख्याध्यापिकेला तीन वर्षे सक्तमजुरी

जामनेर – जन्मतारखेचे बनावटद दस्तऐवज तयार करून शासकीय सेवेचा कालावधी वाढवून घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महानंदा पाटील (कासोदा, ता. एरंडोल) यांना तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाटील या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.

जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश दि. न. चामले यांनी बुधवारी हा निकाल दिला. पाटील या कासोदा येथील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. सेवानिवृत्तीनंतरही सेवेत राहून लाभ मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी जन्मतारीख नमूद करून जामनेर येथील तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून जन्मदाखला मिळवला.

याप्रकरणी शिक्षण संस्थेने जामनेर तहसीलदारांकडे तक्रार केली. जामनेरचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी सुनावणी घेतली व पोलिसांकडे फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी तपास केला. या प्रकरणात न्यायालयाने ७ साक्षीदार तपासले. यात साक्षीदार नरेंद्र पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असल्याने शासनाची फसवणूक केल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील कृतिका भट यांनी केला. सहायक सरकारी वकील रवींद्रसिंग देवरे, अनिल सारस्वत यांनी काम पाहिले. त्यांना प्रसन्न पाटील यांनी सहकार्य केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh