हल्ली आबालवद्धांवर सोशल मीडियाने जादू केली असून अधिकाधिकल लाईक, कॉमेंट मिळाव्या यासाठी बहुसंख्यजण धडपड करत असतात. हल्ली व्हिडीओचा जमाना असून रिल्स हे प्रसिद्धीचे नवे साधन बनले आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचारीही रिल्स बनवत असतात. काहीजण कार्यालयात असतानाही असले व्हिडीओ बनवतात. काम करणे सोडून असले रिल्स बनवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या यादीत उत्तर प्रदेशातील कासगंज येथील एका महिला पोलीस हवालदाराचाही समावेश झाला आहे.
आरती सोलंकी नावाच्या महिला हवालदाराने कर्तव्यावर असताना ‘जिंदगी ने दी हवा… थोड़ा सा धुआं उठा और आग जल गई’ या गाण्यावर रील बनवले होते. हे रिल बऱ्यापैकी व्हायरल झाले, मात्र या व्हायरल रिलनेच सोलंकी यांचा घात झाला. हे रिल सोलंकी यांच्या वरिष्ठांनीही पाहिले. पोलीस अधीक्षकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला. सोलंकी यांची चौकशी केली असता त्यांनी कर्तव्यावर असताना यापूर्वीही असे रिल बनवले होते असे उघड झाले आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी तत्काळ सोलंकी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.