एखाद्या व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण करताच त्याचे नाव आपोआप मतदार यातील समाविष्ट केले जावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या संदर्भातील एक विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. जन्म, मृत्यू नोंदणी मतदारयादीशी जोडली जाणार असून याद्वारे 18 वर्षे करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत जोडले जाईल असा हा प्रस्ताव आहे.
अमित शहा यांनी सोमवारी जनगणना भवनाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना शहा यांनी म्हटले की जन्म आणि मृत्यू यादीचा मतदार यादीशी मेळ घातला जाणार असून त्यासंदर्भातील एक विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. जनगणना ही विकास धोरणाचा आधआर बनू शकते असं शहा यांनी म्हटलं आहे. डिजिटल जनगणनेतून प्रसिद्ध होणारे आकडे हे फायदेशीर ठरू शकतात असेही ते म्हणाले. या आकड्यांच्या आधारे विकासाची गंगा गरीबापर्यंत कशी पोहोचवता येईल हे सुनिश्चित तेले जाऊ शकते असे ते म्हणाले.
अमित शहा यांच्या या घोषणेनंतर, जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मध्ये बदल झाला तर त्याचे काय परिणाम होतील यावर चर्चा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या बदलामुळे कामं अधिक सोपी होतील. ड्रायव्हिंग लायसन्सपासून पासपोर्ट जारी करण्यापर्यंत अनेक सरकारी कामे जलदगतीने होऊ शकतील असं या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.