‘आंबेडकरांचा फोटो फाडणा-या आव्हाडांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल’

पालकमंत्री हसन मुश्रीफांची सडकून टीका

‘आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण देशवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या आहेत. आव्हाड यांनी कितीही माफी मागितली तरी त्यांचे हे कृत्य पुसले जाणार नाही. त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल’, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच आमचे नेते छगन भुजबळ.. हे आव्हाडांची पाठराखण करायच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा अपमानच विसरले. भुजबळ यांनी आव्हाडांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांचे हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे, असे ठणकावून सांगण्याची गरज होती, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या आठवड्यातच मुंबईत पक्षाच्या बैठकीत अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे धडे येत असल्याचा उल्लेख करीत भुजबळ यांनी हा विषय काढला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, ‘अभ्यासात येऊ घातलेल्या मनुस्मृतीच्या धड्याला आपला कडाडून विरोधच असेल.’ या पार्श्वभूमीवर निव्वळ राजकारण करायचे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चवदार तळ्यावर हा विकृत प्रकार केला. अशा स्टंटबाजी करणा-यांना रोखायलाच हवे, त्यांचा या कृत्याला माफी नाही, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.