परीक्षेत ‘जय राम जी’, ‘विराट कोहली’ लिहिणारे विद्यार्थी झाले उत्तीर्ण, राज्यपालांपर्यंत पोहोचलं प्रकरणं!

आपण अभ्यासलेल्या विषयातील काही प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत विचारलेले असतात. याचे त्यांना उत्तर द्यावे लागते. काही प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारले जातात.

उत्तर पत्रिका तपासणाऱ्यास उत्तर विचारलेल्या प्रश्नाशी मिळते जुळते वाटले तर त्याप्रमाणे त्याचे गुण मिळतात. यावरुन तुम्ही पास की नापास होणार हे ठरते. दरम्यान काही येत नसेल तर काहीतरी लिहून ये असा सल्ला घेऊन आलेले विद्यार्थी उत्तरपत्रिका ‘काहीतरी’ लिहून भरुन काढतात. या काहीतरी लिहिण्याचे विद्यार्थ्याला मार्क्स दिले जातात, त्यावेळी प्रश्न उभा राहतो.

उत्तर प्रदेशात एका विद्यापीठात असा प्रकार घडला. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत प्रश्नाचे उत्तर लिहिण्याऐवजी ‘जय राम जी’ आणि क्रिकेटपटूंची नावे लिहिली. इथपर्यंत सर्व समजू शकतो पण या विद्यार्थ्यांला परीक्षेत उत्तीर्ण घोषित करण्यात आल्यानंतर सर्व प्रकार गंभीर बनत केला. यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी मनाला वाटेल ते लिहितील. मग अशा सर्वांना उत्तीर्ण करणार का? असा प्रश्न विचारला जातोय. वातावरण तापल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांवर कडक कारवाई केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

विद्यार्थ्याकडून आरटीआय दाखल

जौनपूरच्या वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठाची परीक्षा गेल्यावर्षी पार पडली होती. या परीक्षेत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर विद्यापीठात शिकणाऱ्या दिव्यांशु सिंग नावाच्या विद्यार्थ्याने 3 ऑगस्ट 2023 रोजी आरटीआय दाखल केला होता. फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षाच्या 18 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकारात करण्यात आली होती. दिव्यांशुने या विद्यार्थ्यांचे रोल नंबरही दिले होते. माहिती अधिकारात त्याला ही माहिती पुरवण्यात आली.यानंतर 12 डिसेंबर 2023 रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले. त्याला उत्तर म्हणून विद्यापीठ प्रशासनानेही चौकशी समिती स्थापन केली होती. गंभीर बाबीचा तपास करण्यात आला. यानंतर पेपर तपासणीत अनियमितता समोर आली होती.

विद्यापीठातील दोन प्राध्यापक विनय वर्मा आणि आशिष गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप दिव्यांशुने केला होता. दिव्यांशु केवळ आरोप करुन थांबला नाही. त्याने यासंदर्भातील पुरावे सादर केले. तसेच राज्यपालांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर प्रकरणाची चर्चा राज्यभरात झाली. त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या वादग्रस्त उत्तरपत्रिका काटेकोरपणे तपासण्यात आल्या. त्या उत्तरपत्रिकांमध्ये ‘जय राम जी’ अशा घोषणा आणि रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांसारख्या क्रिकेटपटूंची नावे लिहिल्याचे समोर आले. प्रश्नाचे उत्तर लिहिण्याऐवजी विद्यार्थ्यांनी भलतेच काहीतरी लिहिले होते. असे असतानाही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले होते.

राजभवनकडून कारवाईचे आदेश

दिव्यांशुच्या तक्रारीची राजभवनाकडून दखल घेण्यात आली. यानंतर दोषी प्राध्यापकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. चुकीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी दोन प्राध्यापकांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू वंदना सिंग यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच याबाबतची माहिती राजभवनालाही पाठवण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रोफेसर विनय वर्मा यांची आधीची कुंडलीदेखील यानिमित्ताने समोर आली आहे. त्यांच्यावर असे आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही अनेकदा असे आरोप झाले आहेत. दरम्यान विद्यापीठाकडून कारवाई करत 2 प्राध्यापकांना निलंबित केले आहे.