मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा साधेपणा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरात वाढपी बनून सेवा

अक्कलकोट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचे दाखवून देतात, पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील त्याला अपवाद नाहीत.

यांचा प्रत्यय नुकताच अक्कलकोट येथे पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तसेच शिंदे कुटुंबातील काही सदस्यांनी नुकतीच अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली. मात्र यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन त्यांनी वाढपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला.

हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण सुखावले

तसेच त्यांना वाढून झाल्यानंतरच स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत सर्वसामान्य भक्तांसोबत बसून प्रसाद ग्रहण केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन सुखावले. एकीकडे आमदार खासदार दर्शनासाठी आले की, त्यांचे दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळावे लागते.

बडेजाव बाजूला ठेवला

मात्र इथे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी आपला मिसेस मुख्यमंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढतायत आणि सोबत बसूनच तो ग्रहण करतायत हे पाहून उपस्थित भक्तगण अवाक झाले.

छोट्याशा कृतीतून दिसला मोठेपणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांच्यातील एक होऊन वावरताना आपल्याला दिसतात. मात्र त्यांच्या पत्नी देखील त्याला अपवाद नाहीत हे त्यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आले.