प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे भुसावळ तालुका सहसचिव योगेश गांधेले यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी सोमवार दि. २० रोजी निवड करण्यात आली.
महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ नंतर सर्व विभागातील नियुक्त राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन बंद करून नवीन एनपीएस योजना सुरू केली आहे. त्या विरोधात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना लढा देत आहे. जुन्या पेंशन योजनेवरुन केंद्र आणि काही राज्यांमध्ये वाद सुरु आहे. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड आणि आता हिमाचल प्रदेश सरकारांनी जुनी पेंशन योजना पुनर्संचयित केली आहे. या पार्श्वभमीवर महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी संघटना करीत आहे.
राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने जिल्हा अध्यक्ष डॉ कुणाल पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा जळगाव जिल्ह्याचा विस्तार केला. यात भुसावळ विभागातून जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश गांधेले, जिल्हा सल्लागार ॲड मनिषा देशमुख आणि जिल्हा संघटक म्हणून टी एम करणकाळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.