रावेर : जिल्ह्यात गाजत असलेल्या रावेरातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कंत्राटी गट समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या नेत्याच्या वरदहस्त असल्याशिवाय व प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीशिवाय मोठ्या प्रमाणावर अपहार करणे शक्य नाही त्यामुळे या घोटाळ्याची पारदर्शीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे पदाधिकार्यांनी केली.
आमदार चौधरींना निवेदन
निवेदनाचा आशय असा की, भ्रष्टाचारातील दिड कोटी ही रक्कम फक्त ऑगस्ट 2020 पासूनच आहे मात्र कंत्राटी कामगार हे सन 2012 पासून रावेर पंचायत समितीत नियुक्तीवर आहेत त्यामुळे त्यांच्या नियुक्तीपासून सखोल चौकशी झाल्यास हा अपहाराचा आकडा आणखी काही कोटींच्या घरात जाईल याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या घोटाळ्याचे मास्टरमाईंड, या आरोपींचे राजकीय गॉडफादर व खेड्यापाड्यातून प्रकरणे आणून देणारे एजंट आदींवर कठोर कारवाई होवून खरे चेहरे जनतेपुढे यावेत यासाठी शौचालय घोटाळ्याची सन 2012 पासून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी आमदारांकडे करण्यात आली. निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, रावेर तालुका काँग्रेस अनु.जाती विभागाचे तालुकाध्यक्ष सावन मेढे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप साबळे, काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, धुमा तायडे उपस्थित होते.