शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते, मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला. शिवसेनेच्याच जेष्ठ नेत्याला मुख्यमंत्री कोण आहेत याचा विसर पडल्याने राजकीय वर्तुळात टीका-टिपण्ण्या सुरु झाल्या. यावरुनच आता भाजपचे नेते आणि राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या निलेश राणे यांनी राऊतांवर चांगलंच तोंडसुख घेतले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.
“शिवसेना खासदार विनायक राऊत यांना अद्याप माहिती नाही की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची. नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे”, असं म्हणत राणे यांनी विनायक राऊतांना टोला लगावला.
राऊत हे सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाध्यमांशी बोलताना यांनी चक्क अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला. शिवसेनेचे पक्षप्रमुखच राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेना नेत्यालाच याचा विसर पडल्याने राजकीय वर्तुळात यांची जोरदार चर्चा रंगली आहे.