जळगाव जिल्ह्यात 8 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता

जळगाव – 1 मे (हिं.स.) अठराव्या लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यासाठी जिल्ह्यात दि. 13 मे रोजी मतदान होणार असून भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोड धडकणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे देखील नियोजन सुरु आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न केले जात असून दि. 8 मे रोजी मोदींची सभा होण्याची शक्यता आहे. माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून सारेच पक्ष प्रचारावर भर देत आहे. भाजपने स्टार प्रचारकांना मैदानात उतरविले असून जिल्ह्यात येत्या आठवड्यात मोठ्या नेत्यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे व जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेना (उबाठा) असा संघर्ष होणार असून रावेरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या सभेचेही नियोजन करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे रावेर व जळगावसाठी वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत असून त्यात पंतप्रधान मोदी यांच्या सभेची मागणी करण्यात आली असून पीएमओ कार्यालयाने जळगावात सभा घेण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची तर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या सभांचे नियोजन सुरु आहे.