पाचोरा : विवाहानंतरच्या मधूचंद्राच्या रात्री नवविवाहित वधू साथीदारासह पसार झाल्याप्रकरणी तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार नववधूसह तिच्या तीन साथीदारांना पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी अटक केली आहे. संशयीत चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सव्वा लाखांचा गंडा घालून नवविवाहिता पसार
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील चेतन विलास चौधरी (रा.संजय नगर पिंपळगाव (हरेश्वर) यांचा विवाह मध्यप्रदेशातील मोहमांडळी, ता. जि.खरगोन (मध्यप्रदेश) येथील कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे हिच्याशी झाला होता. या लग्नासाठी सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य (रा.सोनवद, जि.बडवानी), हापसिंग उर्फ आपसिंग शिकार्या पावरा (हैद्रयापाडा, ता.शिरपूर, जि.धुळे) व अनिल विश्राम धास्ट (मोहमांडळी, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांच्या मध्यस्थी एक लाख 26 हजार रुपये घेऊन 3 मे 2022 रोजी झाला होता. दरम्यान विवाहाच्या दुसर्याच दिवशी वधू कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे ही आपल्या शिरपूर येथील साथीदारासोबत रात्री दोन वाजता पसार झाली. याप्रकरणी चेतन चौधरी यांनी शुक्रवार, 6 मे रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात खरगोन (मध्यप्रदेश) व शिरपूर (धुळे) येथून नवविवाहितेसह तिच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. दरम्यान, युवतीसह तिया साथीदारांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.