जळगाव – ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समिती (वडनगरी फाटा) येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची सातदिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित केली आहे. या कथेला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत. कथा श्रवणासाठी सात लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या संदर्भात आढावा घेऊन रविवारी ४२ समित्या गठीत करण्यात आल्या. बैठकीला दोन हजार शिवसेवक उपस्थित होते. व्यवस्थेसाठी गठीत समित्यांत आठ हजार सेवेकरी असून त्यात पाच हजार महिला आहेत अशी माहिती आयोजन समितीतर्फे जगदीश चौधरी यांनी दिली.
बडे जटाधारी महादेव मंदिरात शिवपुराण कथेदरम्यान सेवेसाठी नाव नोंदणी केलेल्या शिवभक्तांना कामाची विभागणी करण्यासाठी व इतर सेवेबाबत आखणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सेवेबाबत नाव नोंदणी करण्यात आलेल्यांनी बडे जटाधारी महादेव मंदिरात झालेल्या बैठकीसाठी मोठी गर्दी केली होती. या बैठकीत विविध ४२ समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांत २५ ते ४५ वयोगटादरम्यान आठ हजार सेवेकऱ्यांचा समावेश आहे. यात तब्बल पाच हजार महिला शिवसेविका तर तीन हजार पुरुष सेवकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अखंड सेवा देणार आहेत.
आधी केवळ दररोज ५० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे नियोजन अपूर्ण पडून ते कोलमडेल म्हणून आता दीड ते दोन लाख लोकांची जेवणाची व्यवस्था दररोज करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. तसेच यात दररोज ७५ हजार भाविक या शिवपुराण कथेदरम्यान मुक्कामाला थांबणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.