पोलीस कोठडीत कुणाल राऊत यांची तब्येत बिघडली; मेयो रुग्णालयात केलं दाखल

पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी होते तुरुंगात

नागपूर – नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना रविवारी अटक करण्यात आली. मात्र, पोलीस कोठडीत असतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना मेयो रुगणालयात म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये   उपचाराकरिता दाखल करण्यात आलं. कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलीस कोठडीत असताना कुणाल राऊत यांच्या पोटात दुखू लागल्याने काल रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. न्यायालयाने कालच कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना शारीरिक त्रास उद्भवला. बुधवारपर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असताना त्यांची तब्येत बिघडली आहे. ही पळवाट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचा प्रकाराविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेसमोरच्या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरत जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं. तर दुसरीकडे भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याच्या कृतीला आपले समर्थन नसल्याची भूमिका नागपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे याप्रकरणी कुणाल राऊत यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला.