मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापूरमध्ये महाविजय संकल्प सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास अर्धा तास भाषण केले. या सभेला विक्रमी गर्दी झाल्याचा दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र, हे फोटो खरंच कोल्हापूरचे आहेत का, व्हायरल झालेले फोटो नेमके कोणत्या भागातील आहेत.

दावा काय?

एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर भाजपा समर्थकांकडून पोस्ट करण्यात आली आहे. भाजपा समर्थकाच्या हँडलवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यात युजरने म्हटले आहे की, भावा हे कोल्हापूर हायं, जय भवानी जय शिवाजी, तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार, मा. नरेंद्र मोदी गर्दीचे सारे रेकॉर्ड तोडले कोल्हापूरकरांनी.

X वरील पोस्टचं अर्काईव्ह व्हर्जन येथे पाहता येईल.

मोदींच्या सभेला गर्दी, असा दावा करणाऱ्या पोस्टचा स्क्रीनशॉट

तर आणखी एका भाजपा समर्थकाने कोल्हापूरच्या रॅलीला विराट गर्दी, अशा आशयाची पोस्ट केली आहे. ही पोस्ट हिंदी भाषेत आहे. या पोस्टचं अर्काईव्ह व्हर्जन येथे पाहता येईल.

कोल्हापूरमधील सभेला गर्दी, असा दावा करणाऱ्या पोस्टचा स्क्रीनशॉट

Fact Check मधून काय समोर आले?

यात Yandex वर रिव्हर्स इमेज सर्च केले असता फोटो नायजेरियाचा असल्याचे उघड झाले. केनियामधील पल्सलाइव्ह.कॉ.केई या न्यूजपोर्टलवर फोटोचा संदर्भ सापडतो. हा फोटो २००० मधील असल्याचे यात म्हटले आहे. ख्रिश्चन धर्मासाठी काम करणाऱ्या cfan या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित रॅलीमधील हा फोटो असल्याचा दावा या वृत्तात केला आहे. या रॅलीत राईनहार्ड बोंके यांनी संबोधित केले होते. राईनहार्ड यांनी पाच दिवस नायजेरियातील लागोस येथे ही रॅली घेतली होती. या रॅलीनंतर आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध धर्मगुरू म्हणून ते ओळखले जात होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. केनियातील वेबसाईटवरील सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे .

या वृत्तामधील महत्त्वाचे किवर्ड्स हे संदर्भासाठी घेऊन ‘गुगल’वर सर्च केले असता christianitytoday या वेबसाईटवरही नोव्हेंबर २००० मध्ये राईनहार्ड यांनी नायजेरियात रॅली घेतली होती, असा उल्लेख सापडतो. तर एका युजरने फेसबुकवर २०१२ मध्ये पोस्ट शेअर केली होती. यात त्याने राईनहार्ड बोंके यांना २००० मध्ये लागोस येथील रॅलीत भेटल्याचे म्हटले होते. ही पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोल्हापूरमधील सभेसंदर्भात सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल केला जात आहे. गुगल तसेच yandex वर रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा फोटो चीनमधील लोकसंख्या किंवा जगातील वाढती लोकसंख्या या संबंधित ब्लॉग तसेच लेख यासाठी वापरल्याचे निदर्शनास आले.

गुगल सर्चमध्ये 2012 मधील एका लेखात हा फोटो वापरला आहे.

गुगलवर किवर्डच्या आधारे सर्च केले असता Flickr वर फोटोचा संदर्भ सापडतो. २००८ मध्ये चीनमधील Guangzhou या परिसरातून ऑलिंपिक ज्योत जाणार होती. यासाठी ही गर्दी जमल्याचा उल्लेख यात आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे . तसेच Getty Image वर मे २००८ मध्ये Guangzhou, shenzhen या भागातील ऑलिंपिक ज्योतचे फोटो आहेत.

निष्कर्ष :

सोशल मीडियावर कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला विक्रमी गर्दी असा दावा करत जे दोन फोटो व्हायरल करण्यात आले आहेत, ते फोटो महाराष्ट्रातील नाहीत. ते फोटो नायजेरिया आणि चीनमधील आहेत.