प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, तर 16 आमदार अपात्रच होतील; नरहरी झिरवळ

नरहरी झिरवळ मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी.

आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असं नरहरी झिरवल म्हणाले. विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असं म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला.

कोर्ट कोर्ट आहे

माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकतं? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. हे प्रकरण महत्त्वाचं आहे हे सर्वच म्हणतात. तेव्हाही महत्त्वाचं होतं. आजही त्याचं महत्त्व आहेच, असंही झिरवळ यांनी सांगितलं.

स्वप्न पाहायला काय हरकत आहे

तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. केलं तर मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवं ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असं समजायचं. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. खुर्ची रिकामी नाहीये. पण सत्ता संघर्षावर लोकांचा तर्कवितर्क आहे. जर तरचा प्रश्न आहे. त्याला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

तेव्हाच दादा जातील ना

यावेळी त्यांनी दैनिक सामनातील अग्रलेखावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रात उत्तर दायित्व आहे की नाही, अशी शंका येणं साहजिक आहे. पण सुप्रियाताई आहेच, त्यामुळे शंका घेण्याचे काम नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. काही नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याची एक ते दीड महिन्यांपासून चर्चा आहे. आम्ही गेलो तर दादा जातील ना… पण आम्हालाच काही माहीत नाही. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या चर्चांचा आणि राजीनाम्याचा (शरद पवार यांचा राजीनामा) काही संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh