नागपुरात मोफत किचन किट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी; भोवळ येऊन महिलेचा मृत्यू

नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भोवळ येऊन एका महिलेचा मृत्यू झाला. नागपूरात किचन किट वाटप केलं जात आहे. यासाठी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात महिलांची प्रचंड गर्दी झालेली आहे.

याच गर्दीत एका महिलेचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

नागपूरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना किचन किट वाटप केलं जात आहे. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात हे वाटप केलं जात असून या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे. या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. किटन कीट घेण्यासाठी सकाळपासून सुरेश भट सभागृहासमोर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे.

8 मार्च ते 11 मार्च दरम्यान कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या सुमारे एक लाख कामगारांच्या कुटुंबाना किचन सेट दिले जाणार आहेत. कामगारांना किचन किट वाटप सुरू होत असल्याची माहिती मिळताच सकाळपासून नोंदणीकृत कामगारांच्या कुटुंबीयांनी भट सभागृहासमोर मोठी गर्दी केली आहे. गर्दीमुळे झालेल्या धक्काबुक्कीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही महिला जखमी झाल्या असल्याचंही समोर येत आहे. मनू तुळशीराम राजपूत (वय 65 वर्ष) राहणार आशीर्वाद नगर असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.