पुणे – समृद्धी महामार्गावर सर्वांत जास्त अपघात हे मानवी चुकांमुळेच झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीचा अपघातही चालकाला डुलकी लागल्यानेच झाल्याचे बोलले जात आहे. चालकाने लेन कटिंग करत रस्त्याच्या उजव्या बाजूला क्रॅश बेरिअरच्या खांबाला धडक दिली.
त्यानंतरच हा भीषण अपघात घडला. समृद्धी महामार्गावर डिसेंबर २२ ते ३० जून दरम्यान या महामार्गावर ३५८ अपघात झाले असून, यात १०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ झाले. तेव्हापासून यावर अपघाताचे सत्र सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ३५८ अपघात घडले आहेत. आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १६९ हे प्राणांतिक अपघात असून, यात १०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ११० हून अधिक अपघात हे चालकाला झोप लागल्याने झाले आहेत.
महामार्ग पोलिस व आरटीओ प्रशासनाने अपघातांच्या कारणांचा शोध घेतला असता ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे ७२, प्राणीमध्ये आल्याने १८, तांत्रिक बिघाडामुळे १६, ब्रेकडाऊन झाल्याने १४, तर इतर काही कारणांमुळे ७४ अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
२१ हजारचालकांचे समुपदेशन
आरटीओ व महामार्ग पोलसांनी समृद्धी महामार्गावर मागील सात महिन्यांत २१ हजार ५३ वाहनचालकांचे प्रबोधन केले आहे. यासह विविध कारणांसाठी कारवायादेखील केल्या आहेत.
- २४४ – अतिवेगाने वाहन चालविणे
- २२०६ – लेन कटिंग
- ३१६७ – नो पार्किंग
- १०४३ – रिफ्लेक्टर नाही
- ९७३ – प्रतिबंधित भागातून प्रवेश करणे
चालकांनो काळजी घ्या
जडवाहनाचे चालक लेन कटिंग करतात, ते रस्त्याच्या बाजूच्या लेन मधून न जाता. कारसाठी राखीव असलेल्या लेनमधून प्रवास करतात.
- वाहनांची व टायरची स्थिती चांगली हवी.
- वाहनांची स्थिती चांगली नसेल तर वाहनांचा वेग वाढवू नका.
- रस्ता मोकळा दिसला म्हणून वेगाने वाहन चालविताना आपल्या वाहनांची स्थिती लक्षात घ्या.
- दर दोन तासांनी ब्रेक घ्या.
- टायरमधली हवा संतुलित हवी.
या कारणांमुळे होतात अपघात
- अतिवेगाने वाहन चालविणे
- टायर फुटल्याने
- लेन कटिंग
- चालकाला डुलकी लागल्याने
- नजर एकाच ठिकाणी स्थिर झाल्याने काही सेकंदासाठी चालक संमोहित झाल्यासारखे होतात.
काय आहेत उपाययोजना
- अपघातांची संख्या कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी व आरटीओ प्रशासनाने विविध स्तरावर प्रयत्न
- या मार्गावर २४ तास पोलिसांची गस्त सुरू
- अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी नवी प्रणाली विकसित
- अशा वाहनांना टोलनाक्यावर थांबून कारवाई.
- चालकांचे समुपदेशन
- टायरची स्थिती ठीक नसेल, तर अशा वाहनांवर कारवाई.
- खराब टायर असलेल्या वाहनांना महामार्गावर प्रवेश नाही.