म्हासुर्लीचे सरपंच, उपसरपंच अपात्र; कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांचा निर्णय

तालुक्यातील म्हासुर्ली गावच्या विद्यमान सरपंच मीना कांबळे यांना मासिक सभा न घेतल्याच्या कारणावरून, तर उपसरपंच शबाना मुलाणी यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत आर्थिक हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र केले. याबाबतची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांनी केली होती.

 

म्हासुर्लीसह इतर वाडय़ावस्त्या मिळून गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. या ग्रामपंचायतची तीन वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक होऊन एकाच गटाचे सर्व अकरा सदस्य निवडून आले होते. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्याने सदस्यांत दोन गट पडले. एकमेकांविरोधात तक्रारी सुरू झाल्या होत्या. परिणामी गेल्यावर्षी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याच्या तक्रारीच्या कारणावरून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबूराव कांबळे अपात्र झाले होते.

मीना कांबळे यांनी एप्रिल 2021ची मासिक सभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर केल्याची, तर उपसरपंच शबाना मुलाणी यांचे पती नौशाद मुलाणी यांनी गाडीच्या भाडय़ापोटी ग्रामपंचायतीकडून रक्कम स्वीकारून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी बाबूराव कांबळे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. या प्ररणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱयांनी सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र केले.