मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये.
परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी वाढली आहे, देशातल्या कापसालाही बांगलादेशातून मोठी मागणी होत आहे. तसेच चीनकडूनही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या आठवड्यात कापूस बाजाराने काही उभारी घेतल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ८ हजारांवर असलेला कापूस बाजार भाव आता ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.