काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा…! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले

जळगाव – उध्दव ठाकरे यांच्या सभेत घुसण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे व बाहुबलीची प्रतिमा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला आमदार किशोर पाटील यांनी जळगाव शहराच्या बाहेरच रोखले.

हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली.

पाचोऱ्यातील उध्दव ठाकरे यांच्या सभेत घुसण्याची भाषा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. दगड मारुन सभा, आंदोलन उधळणारे आम्ही आहोत असे बोलून गुलाबरावांनी ठाकरे गटाला आव्हान दिले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी युटर्न घेत आधी सेना जाते व नंतर सरदार जातो अशी भूमिका घेतली होती. पिंप्राळ्यातील शिवस्मारक भूमीपुजन सोहळ्याला भेट देऊन उध्दव ठाकरे पाचोऱ्याकडे रवाना झाले. सायंकाळी होणाऱ्या त्यांच्या सभेत घुसण्यासाठी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील हे समर्थकांसहपाचोऱ्याकडे निघाले. सर्वांनी गुलाबरावांचे मुखवटे घातले होते तर बाहुबलीच्या वेशात गुलाबरावांचा चेहरा एक असलेले कटआऊट त्यांच्यासोबत होते. शहराच्या बाहेर निघताच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेटस‌् लावून त्यांना अडवले. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील तेथे दाखल झाले. आजचा हा कार्यक्रम घरातील आहे. काकांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागू नये अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही येथून माघारी फिरा अशी विनंती पाटील यांनी केली.

तेव्हा ठाकरेंनी आर ओ पाटलांकडे फिरुन पाहिले नाही

आर. ओ.पाटील मुंबईत ५२ दिवस रुग्णालयात होते. त्यावेळी मी व बहिणी वैशाली यांनी उध्दव यांना हकिकत सांगितली. मातोश्रीवर गेलो. पण ते दवाखान्यात भेटायला आले नाहीत. अपमान केला. कधी फिरुन पाहिले नाही. निधनानंतर सांत्वनपर साधा फोन केला नाही. असे असताना गुणवान बापाची पोरगी यांच्यासोबत जाऊन कळवट शिवसैनिक असल्यासारखी दाखवित असल्याची खंत किशोर पाटील यांनी व्यक्त केली. राहिला संजय राऊत यांचा विषय…त्यांचा हिशेब नंतर चुकता करु असे ते यावेळी म्हणाले.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh