Jalgon news : दिव्यांग व्यक्तींच्या साहित्य खर्चमर्यादेत वाढ

जळगाव – आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, आमदार स्थानिक विकास योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या कमाल खर्च मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय अखेर शासनाने घेतला असून,

आता वार्षिक केवळ दहा लाख रुपयांऐवजी तीस लाख रुपये खर्चमर्यादा करण्यात आली आहे. शासनाने याबाबतचा निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील दिव्यांग बांधवांना आता आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.

आमदार किशोर पाटील यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत पाचोरा व भडगाव येथे स्वतंत्रपणे दिव्यांग बांधवांच्या नोंदणीसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल, व्हील चेअर, कृत्रिम अंग व उपकरणे आदी साहित्य उपलब्धता होणार आहे.

मात्र यात नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींची संख्या व आवश्यक सहाय्यक साहित्यांची संख्या विचारात घेता ते शासनाने निर्धारित केलेल्या दहा लाख रुपये खर्च मर्यादेत बसणे शक्य नसल्याने,

यात वाढ करून सदर रक्कम किमान तीस लाख रुपये करण्याची आग्रही मागणी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

शासनाने या मागणीची दखल घेऊन याबाबचा शासन निर्णय जाहीर करून खर्च मर्यादा दहा लाखावरून तीस लाख रुपये केली आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्यभरातील दिव्यांग बांधवांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

पाचोऱ्यातही होणार साहित्य वाटप

आमदार किशोर पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या आवश्यक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सुमारे १० लाख रुपयांच्या साहित्याचे यापूर्वीच वाटप झाले असून,

आता लवकरच पाचोरा तालुक्यातील तपासणीशिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली.