पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं : राज ठाकरे

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरोपही केले.

तर एका नेत्याने त्यांची या मुद्द्यावरून साथही सोडली. २०१९ मध्ये भाजपसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी आता भूमिका बदलल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. बैठकीनंतर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी भूमिका बदलली नाही तर धोरणांवर टीका केली.

नरेंद्र मोदींना पाठिंबा हे गुढीपाडवा मेळाव्यात मी सांगितलं. त्याचं विश्लेषणही केलं. समर्थन आणि विरोध हेसुद्धा तेव्हा स्पष्ट केलं. मी भूमिका बदलली नाही तर धोरणांवर टीका केली. 370 कलम निर्णय स्वागत केलं. राम मंदिर हा विषय सोपा नव्हता. शरयू नदीतील करसेवकांची प्रेतं, घातलेल्या गोळ्या,या जखमा आहेत. कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तरी नरेंद्र मोदी असल्यानं याचं निर्माण झालं. नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं. या खंबीर नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा दिला असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महायुतीच्या प्रचारात सहभागी होण्यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरेंनी सांगितलं की, प्रचारात सहभागी होण्याबाबत महत्वाचे निर्णय बैठकीत सांगितले. महायुतीतील नेत्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधायचा हा निर्णय घेतला. महायुतीतील नेत्यांनी आम्हाला संपर्क केला की निर्णय होतील. प्रचारात मनसे सक्रिय सहभाग घेणार आहे.

पंतप्रधान मोदींना दिलेल्या पाठिंब्यावर चर्चा केली. महायुतीतील पक्षांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी बोलायचं याची एक-दोन दिवसांत आमची यादी तयार होईल. कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कामाला लागायला सांगितलं. तसंच मी भूमिका बदलली नाही तर धोरणावर टीका केलीय असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.