गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

शिवेसना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी उल्हासनगर कोर्टाने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानं आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं. आता कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहेत महेश गायकवाड?

महेश गायकवाड हे मुळचे कल्याण पुर्वेतील तिसगावाचे भूमिपुत्र आहेत. गणपत गायकवाड यांना केबल व्यावसायात टक्कर दिल्याने महेश गायकवाड चर्चेत आले. त्यांचा श्रद्धा केबल हा केबलचा मोठा व्यवसाय आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांचा कट्टर विरोधक म्हणून कल्याण पुर्वेत महेश गायकवाड उदयास आले. 2015 साली शिवसेना पक्षातून कल्याण डोंबविली महानगरपालिकेत निवडणूक रिंगणात महेश गायकवाड उतरले.

महेश गायकवाड या निवडणुकीत आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू विष्णू गायकवाड यांना पराभूत करत नगरसेवक झाले. बघता बघता महेश गायकवाड यांनी बांधकाम व्यावसायात देखील मोठं नाव कमवलं. एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी महेश गायकवाड यांनी मोठ्या संख्येनं आपले समर्थक घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं.

आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपा शिवसेना युती न झाल्यास गणपत गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड प्रमुख दावेदार आहेत. दोघांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू होतं. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमधील द्वारली गावातील जमिनीवरुन दोघांच्यात वाद निर्माण झाला. त्या जागेवर बांधलेली भिंत महेश गायकवाड यांनी पाडली होती. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. तिथे वाद विकोपाला गेला आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच गोळीबार केला.