पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : चाळीसगाव तालुक्यातील आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव संदेश

जळगाव : खाऊच्या आमिषाने चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीवर नराधम आरोपी संदीप सुदाम तिरमली (36, रा.चाळीसगाव तालुका) याने अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून आरोपीला अटक करण्यात आली होती. जळगाव न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर नराधम आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड सुनावण्यात आला.

चाळीसगाव पोलिसात दाखल होता गुन्हा

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीवर 3 जानेवारी 2021 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराशेजारीच राहणार्‍या नराधम आरोपी संदीप सुदाम तिरमली याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. चिमुकलीनंतर आपबिती कुटुंबियांना सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या पाल्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप सुदाम तिरमलीविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्यात साक्ष ठरली महत्वाची

या खटल्याची सुनावणी ही अतिरीक्त सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकिय अभियोक्ता केतन ढाके यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पीडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सदर तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद करण्यात आला. संदीप सुदाम तिरमली याला दोषी ठरवत न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.