वडगावसिम येथे श्री नीलकंठेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना

चोपडा – तालुक्यातील कोळंबा ग्रुप ग्रा.पं.अंतर्गत वडगावसिम येथील श्री हनुमान मंदिरात वर्षानुवर्षांपासुन स्थापित श्री महादेवाची पिंड जीर्ण झाल्याने तेथे श्रीओंकारेश्वर जवळील बकावा (म.प्र.) येथून नवीन मूर्ती आणून श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामस्थं व पंचक्रोशीतील नागरिक नातेवाईक मित्रमंडळींनी सढळ हस्ते देणगी देऊन मंदिर निर्माण कार्यास हातभार लावलेला आहे. पहिल्या दिवशी ग्रामसफाई करण्यात येऊन गांवभर सडासमार्जन रांगोळ्या पताका केळीचे खांब ध्वज तोरण लावून गावात सजावट करण्यात आली होती. श्रीरेणुका देवीच्या मंदिरापासुन सुशोभित वाहनावर श्री महादेवाच्या मुर्त्या ठेवून गावभर भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य मिरवणुकीत शेकडों कलशधारी मुली, महिला, आबालवृद्ध व तरुणांनी सहभाग घेतला.

दुसऱ्या दिवशी होमहवन साठी २१ यजमान जोडपे बसवण्यात आलेले होते. पुरोहितांनी मंत्रोच्चारात विधिवत अभिषेक करून श्रीहनुमान मूर्ती व श्रीमहादेव मूर्तीची स्थापना पूजा आरती केली. यावेळी गाव व पंचक्रोशीतील हज्जारों भाविकभक्तांनी महाप्रसाद भोजन भंडाराचा लाभ घेतला. रात्री कठोरा येथील भजनमंडळाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सर्वच सत्पात्री देणगीदारांचे आभार मानण्यात आलेत. बऱ्याच वर्षांपासून गावात असा कार्यक्रम झालेला नसल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व एकोपा निर्माण झालेला दिसत होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वडगावसिम येथील बालगोपाल, महिलामंडळ, तरूणवर्ग, वयोव्रुध्द व्यक्ती व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.