अतिक्रमण काढताना महिलेचा हृदयविकाराने मृत्यू ; नागरिक आक्रमक; मृतदेह नेला तहसील कार्यालयात…

अमळनेर-:येथील फायनल प्लॉट 123 मधील रहिवासी अतिक्रमण काढणे सुरू असताना, बेघर झालेल्या पांचाळ समाजाच्या एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने संतप्त समाजबांधवानी मृतदेह काल दुपारी तहसील कार्यालयात नेऊन आंदोलनाची भूमिका घेतली होती.

अखेर 5 डिसेंबर पर्यंत अतिक्रमण मोहीम थांबविण्यासह यावर मार्ग काढण्यासाठी दि 21 नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांच्या वतीने मिळाल्याने आंदोलन स्थगित होऊन मृतदेह घरी हलविण्यात आला.

शोभाबाई रोहिदास पांचाळ (45) असे मयत महिलेचे नाव असून फायनल प्लॉट 123 मध्ये त्यांचा अनेक वर्षापासून रहिवास आहे. पालिका याठिकाणी व्यापारी संकुल उभारत असल्याने न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पालिकेने याठिकाणी असलेले रहिवासी व व्यवसायिक अतिक्रमण काढणे सुरू केले आहे.

रहिवासी कुटुंबांना म्हाडा कॉलनीत हलविण्यात येत आहे, मात्र व्यवसायाच्या दृष्टीने शहरापासून चार किमी दूर राहण्यास जाणे कुटुंबांना अवघड वाटत असल्याने ते विरोध करीत आहेत. अश्यातच काल पांचाळ कुटुंबियांची घरे हटवली जात असताना शोभाबाई पांचाळ या महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने समाजबांधव संतप्त झाले होते. धुळे येथे महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह थेट तहसीलदार कार्यालयात आणण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या वतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमचंद संदानशिव, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पो ना डॉ शरद पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित महिला ऐकण्यास तयार होत नव्हत्या.

यावेळी त्यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र दिले त्यात आम्ही फायनल प्लॉट 123 मधील 60 वर्षांपासून रहिवासी असून आम्हाला याच ठिकाणी राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी जागा मिळावी तसेच अतिक्रमणाच्या दबावाने शोभाबाई यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला नगरपरिषदेत नोकरी द्यावी, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला एक वर्षाची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

पालिकेने दिले लेखी आश्वासन…

आंदोलनकर्त्यांची तीव्र भूमिका लक्षात घेता येथील रहिवासी कुटुबियांना लेखी देण्यात आले, त्यात आपल्या मागणीप्रमाणे फायनल प्लॉट 123 मधील अतिक्रमण काढण्याची मोहीम दि 5 डिसेंबर 2022 पर्यंत थांबविण्यात येत असून यासंदर्भात आपल्या प्रतिनिधींची बैठक दि 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता न.प. कार्यालयात मुख्याधिकारी यांचे समक्ष होईल असे आश्वासन देण्यात आले.यानंतर सदर महिला मृतदेह घेऊन घरी परतल्या, व सायंकाळी ताडेपुरा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.