एकीकडे PM मोदींच्या दौऱ्यावर कडाडून टीका अन् तिकडं ‘सामना’त भाजपची पानभरून जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या मुंबईत दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत.

महाविकास आघाडी आणि शिवसेना सत्तेत असताना मुंबई महानगर पालिकेत केलेल्या मुंबईतील विकास कामांचं श्रेय शिंदे-फडवणवीस सरकार घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. अशातच एकीकडे ठाकरे गटाकडून टीका होत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मोदींच्या मुंबई दौऱ्याची भलीमोठी जाहिरात देण्यात आली आहे. सामनामध्ये मुख्य पानावर पानभरून ही जाहिरात दिल्यामुळे ठाकरे गट आता ट्रोल होऊ लागला आहे.

ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली जात असतानाच शिवसेनेने (ठाकरे गट) जी काम केली त्या कामांच भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तरीदेखील शिवसेनेच्या मुखपत्रातून पानभरून जाहिरात छापल्या असल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

आजच्या दैनिक सामनातील पहिल्या पानावरच ही पानभर जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीत मोदी कोणकोणत्या विकास कामांचं लोकार्पण करणार, कोणत्या कामाचं भूमिपूजन करणार आणि लाभ वितरणाची माहितीही देण्यात आली आहे.