अधिवेशन काळात कोळी जमातीचे आझाद मैदानावर पुन्हा ठिय्या आंदोलन..

राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचे उपस्थितीचे आवाहन

चोपडा – आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय हक्क व अधिकारांसाठी २३ जानेवारीपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच १५ फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक निमंत्रक एडवोकेट शरदचंद्र जाधव पुणे, प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाने व अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी महाआंदोलन उपोषण सुरू होते. परंतु याकडे बेजबाबदार शासन प्रशासन व राजकारण्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे आदिवासी कोळी जमातीतर्फे ह्यांचा तिव्र धिक्कार व निषेध करून आंदोलन उपोषण तुर्त स्थगित करण्यात आलेले होते. परंतु येत्या काळात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने पुन्हा आझाद मैदानावर २९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान तीव्र ठिय्या आंदोलन उपोषण सुरू करण्यात येणार आहे. जर या काळातही मुख्यमंत्री व संबंधित विभागाने सुयोग्य निर्णय घेऊन तोडगा काढला नाही तर पुढील काळात राज्यातील कोळी समाज सत्ताधारी व विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने पिवळ्या झेंड्याखाली कोळी समाजाच्या पक्षाशी संबंधित उमेदवारांना विधिमंडळात पाठवण्यात येईल. तरच आपला प्रश्न सुटू शकेल. यासाठी २९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.