प्राणप्रतिष्ठादरम्यान केवळ 5 जणांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार; पंतप्रधान मोदींसोबत आणखी कोण असणार? जाणून घ्या

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भगवान श्रीरामाच्या मंदिरातील  प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तारीख आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशातचं आता प्राण प्रतिष्ठेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

या कार्यक्रमादरम्यान गर्भगृहात केवळ 5 लोक उपस्थित असणार आहेत. पूजेच्या वेळी गर्भगृहाचा पडदाही बंद राहणार असल्याचे वृत्त आहे. या कार्यक्रमात पीएम मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्य आचार्य राम मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

तथापी, अभिषेक करण्याच्या मुख्य पद्धतींबाबतही एक अपडेट समोर आले आहे. सर्वप्रथम प्रभू रामांना आरसा दाखवला जाईल आणि रामललाला त्यांचा चेहरा दिसेल. यानंतर संघपूजेसाठी आचार्यांच्या 3 पथके तयार करण्यात आली आहेत. पहिल्या संघाचे नेतृत्व स्वामी गोविंद देव गिरी करतील. दुसऱ्या संघाचे नेतृत्व शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती करतील, जे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य आहेत. तर तिसऱ्या संघात काशीतील 21 विद्वानांचा समावेश असणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींसह ‘हे’ मान्यवर राहणार उपस्थित –

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांशिवाय विविध क्षेत्रात देशाचे नाव लौकिक मिळवून देणाऱ्या सर्व प्रमुख व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच सुमारे चार हजार संतांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व शंकराचार्य, महामंडलेश्वर, शीख आणि बौद्ध पंथातील सर्वोच्च संतांना पाचारण करण्यात आले आहे. स्वामी नारायण, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, शेतकरी, कलाविश्वातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh