दहा हजारांची लाच भोवली : शिरपूरातील कनिष्ठ अभियंत्यासह तंत्रज्ञाला धुळे एसीबीकडे कारवाईचा ‘शॉक’

धुळे : डिमांड नोट काढण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या शिरपूरातील वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता समाधान सुधाकर पाटील व वरीष्ठ तंत्रज्ञ निलेश मनोहर माळी यांना धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डिमांड नोटसाठी मागितली लाच
तक्रारदार हे मौजे वरवाडे, ता.शिरपूर येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे खंबाळे, ता.शिरपूर येथे सनी बियर वॉईन शॉप आहे. या ठिकाणी वाणिज्य प्रयोजनासाठी विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीकडे ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी कक्ष सुळे, ता.शिरपूर या कार्यालयात बुधवार, 2 रोजी जावुन कनिष्ठ अभियंता समधान पाटील यांची भेट घेवून त्यांनी केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत व त्या सोबत आवश्यक कागदपत्र जोडुन जमा केले. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याकडे वीज कनेक्शन जोडणीची डिमांड नोट काढण्यासाठी अधिनस्त वरीष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी यांना भेटण्यास सांगितल्यानंतर माळी यांनी तक्रारदार यांच्या संबाळे सनी बियर वाईन शॉप येथे जावून तकारदार यांच्याकडे साहेबांच्या आदेशानुसार 10 हजार रुपये लाच मागितली मात्र ती द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व पडताळणीनंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. शिरपूर येथील महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केला.