उत्तर काशी – उत्तराखंड येथील सियालक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ड्रिलिंगचे काम 50 मीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बोगद्यात जाऊन मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यामुळे मजुरांना रात्री कोणत्याही क्षणी सुरक्षितपणे बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बोगद्याचे कामकाज सुरू असताना काही भाग कोसळल्याने ऐन दिवाळीत 41 मजूर बोगद्यात अडकले होते. गेल्या आठवड्यात बचावकार्यात विघ्न आल्याने नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र हवाई दल, ओएनजीसी, डीआरडीओसह अन्य सरकारी यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून बचाव कार्य अचूकपणे सुरू केले आहे. बोगद्यामध्ये ज्या ठिकाणी मजूर अडकले आहेत, तो भाग बोगद्याच्या प्रवेशापासून साधारण 59 मीटरपर्यंत आत आहे.
बोगद्यातील खडक आणि ढिगार्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली असून अत्याधुनिक ड्रिलिंग मशिन्सद्वारे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे ड्रिलिंगचे काम 50 मीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. आता केवळ 8 ते 9 मीटरपर्यंत ड्रिलिंगचे काम बाकी राहिले आहे. युद्धपातळीवर ड्रिलिंगचे उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मजुरांच्या सुटकेची शुभवार्ता लवकरच कळेल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजुरांच्या सुटकेकडे लक्ष आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. मजुरांचे कुटुंबीय त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, गेल्या 11 दिवसांपासून बोगद्यात 41 मजूर अडकले आहेत. पाईपद्वारे मजुरांना अन्नपाण्याचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यातून आडव्या मार्गावरसुद्धा खोदकाम सुरू आहे. बोरकोटमधून साधारण 9 मीटरपर्यंत खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत खूश खबर मिळणार असल्याची माहिती उत्तराखंडच्या प्रशासनाने दिली.