शिक्षकांकडून इसमाला मारहाण, जळगावात शिक्षकांच्या पतपेढीच्या वार्षिक सभेत मोठा राडा

जळगाव – जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा राडा झाला. सभेमध्ये सत्ताधारी आणि सभासदांमध्ये गोंधळ सुरू असताना एका व्यक्तीला शिक्षकांकडून मारहाण करण्यात आली.

शिक्षकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केल्यामुळे शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एखाद्या व्यक्तीला थेट मारहाण करण्यापर्यंत शिक्षकांचं वागणं बरं नव्हं अशी चर्चा आता रंगली आहे. मारहाण झालेली व्यक्ती पतपेढीची सभासद नसल्याची माहिती जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी दिली आहे.

संबंधित व्यक्तीला शिक्षकांनी मारहाण केली नसल्याचं पतपेढीचे अध्यक्ष यांनी स्पष्टीकरण दिलं. सभासद नसतानाही संबंधित व्यक्ती थेट सभेमध्ये शिरून बेशिस्तपणा करत असल्याने त्याला बाहेर काढल्याची पतपेढीचे अध्यक्षांनी सांगितले. मात्र संबंधित व्यक्तीला सभेला उपस्थित शिक्षकांनी मारहाण केल्याचं व्हिडिओवरून समोर आले आहे. सभेला उपस्थित विरोधकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. मारहाण झालेली संबंधित व्यक्ती कोण? त्याला सभेमध्ये कोणी आणलं? या प्रकाराची अध्यक्षांनी चौकशी करण्याची विरोधकांनी मागणी केली.

नेमकं काय घडलं?

जळगाव शहरातील लेवा भवनमध्ये जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीची 71 वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. नोकर भरती, वकिल फी वरुन सभेला उपस्थित सभासदांनी अध्यक्षांसह सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरल्याने सभेमध्ये गोंधळ उडाला. सभेमध्ये गोंधळ सुरू असतानाच एक व्यक्ती थेट सभेत शिरला. तो सभेमध्ये विषय मंजूर झाल्याचे व्यासपीठावरील सांगण्यात आल्यानंतर समोर येवून नामंजूर नामंजूर म्हणून ओरडत होता.

या गोंधळातच सभेत शिरलेल्या त्या व्यक्तीला सभेला उपस्थित शिक्षकांकडून मारहाण करण्यात येऊन बाहेर काढण्यात आलं. यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदरोळ झाला. दोन तास चाललेल्या सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. मारहाण झालेली व्यक्ती शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्याला पतपेढीच्या अध्यक्षांनी दुजोरा दिलेला नाही. संबंधित व्यक्ती शिक्षकही नाही आणि तो पतपेढीचा सभासदही नाही, असा असताना तो सभेत शिरला आणि बेशिस्तपणा करत असल्याने त्याला बाहेर काढला, अशी माहिती पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड यांनी बोलताना दिली आहे.

दरम्यान या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला असून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीला सभेत आणलं कोणी? अशा गावगुंडांना सभेत कोण आणतं? असे गावगुंड तर सभेत आणत असाल तर सभेला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही. संबंधित व्यक्तीची तसेच प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक गटातील असलेल्या संचालक तुळशीराम सोनवणे यांनी केली आहे.