स्वाभिमानाचा व स्वावलंबनाचा संदेश बाबासाहेबांनी धुळे येथूनच दिला आहे : जयसिंग वाघ 

धुळे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३१ जुलै १९३७ ला न्यायालयीन कामा करिता धुळे येथे आले असता विजयानंद थियेटर येथे आयोजित जाहीर सभेत त्यांचे धुळेकरांनी जोरदार स्वागत केले , बाबासाहेब या वेळेस नुकतेच आमदार म्हणून निवडून आले होते, या प्रसंगी भाषण करतांना त्यांनी मुंबई प्रांतच्या गव्हर्नर व महात्मा गांधी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करून तुंम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व याच करता स्वतंत्र चळवळ करणे मला आवश्यक आहे असे सांगितले, तर १८ जून १९३८ ला म्युंसिपल शाळा क्र. ५ च्या प्रांगणात भाषण करतांना त्यांनी दुसऱ्याचा अंकित न राहता आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे , जो दुसऱ्यांच्या मदतीवर जगतो तो दुसऱ्याचा गुलाम होतो असे सांगितले तेंव्हा ‘स्वाभिमान’ व  स्वावलंबन  ही दोन मूलभूत तत्वे अंगिकारण्याचा महत्वपूर्ण संदेश बाबासाहेबांनी याच धुळे भूमीतून दिला आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

लांडोर बंगला येथे ३१ जुलै रोजी भीम स्मृती यात्रेत जळगाव येथील सहभागी जनतेस मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते. सारा फाऊंडेशन जळगाव या संस्थे तर्फे जळगाव येथील पन्नास भीम सैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.

जयसिंग वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी धुळे येथे भेटी दिलेल्या सर्व स्थळांचे दर्शन घडविण्यात आले. लळिंग या गावी मार्गदर्शन करतांना वाघ यांनी सांगितले की बाबासाहेबांनी या गावी १८ जून १९३८ ला पूनाजी अण्णा लळिंगकर यांच्या आग्रहाखातर आलेले आहेत, या प्रसंगी त्यांना पुरणपोळी, बासुंदी व अन्य पदार्थांचे जेवण देण्यात आले होते, या प्रसंगी त्यांनी महिलांना उद्येशून भाषण केले व त्यांना स्वच्छ, टापटीप राहण्याचे व कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा न पाळण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महिलांचा पुढाकार मोठ्याप्रमाणात होता त्यांनी विविध प्रकारची गाणी म्हटली तसेच बाबासाहेबांसोबत चर्चा करून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. जनतेने बाबासाहेबांनी धुळे येथे दिलेल्या स्वाभिमान, स्वावलंबन, अंधश्रद्धेला विरोध या त्रयींचा अंगिकार करावा असे आवाहन शेवटी वाघ यांनी केले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव हे होते त्यांनी लळिंग यात्रेचा इतिहास सांगून पुढील वर्षी १११ भीमसैनिकांना जळगाव येथून आणण्याचा संकल्प बोलून दाखविला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे, प्रास्ताविक भीमराव तायडे, परिचय अरविंद बिऱ्हाडे , स्वागत संजय सोनावणे , आभार प्रदर्शन सुभाष इंगळे यांनी केले. गुलाबराव बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखा भालेराव, साधना बाविस्कर, हरिभाऊ भालेराव उषा खैरनार यांनी सुरवातीस त्री सरण, पंचशील म्हटले .