महेंद्र सोनवणे
ममुराबाद -:येथील जि.प.प्राथमिक मराठी व सेमी इंग्लिश स्कूल शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अविनाश मोरे ३६ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर जानेवारी महिना अखेर सेवानिवृत्त होत असल्याने असोदा केंद्रातर्फे बुधवार दि .१८ जानेवारी २०२३ रोजी असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे यांच्या हस्ते सपत्नीक भेटवस्तू देऊन सत्कारीत करण्यात आले .
सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप होत्या. प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र चिंचोले,निवृत्त केंद्रप्रमुख युवराज परदेशी ,ग्रेडेड मुख्याध्यापक दिनेश महाजन, संदिप पाटील, निवृत्ती खडके, प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील मान्यवर उपस्थित होते. अविनाश मोरे यांच्या गौरवार्थ भाषण करतांना फुपनगरी शाळेची माजी विद्यार्थीनी गायत्री चौधरी म्हणाली की, ‘ माझी परिक्षा फी पितृतुल्य मोरे सरांनी भरल्यामुळेच मी आज उच्च शिक्षण घेत आहे. आजही सर आम्हाला सुख दुःखात वेळोवेळी मातृवत्सलतेने निरंतर मानसिक आधार देत असतात. विस्तार अधिकारी सानप मॅडम यांनी मोरे यांच्या कर्तव्यदक्षता व शिस्तप्रिय गुणांचे कौतूक करीत काही प्रसंगचित्रे सांगितली.केंद्र प्रमुख वाघे गौरवार्थ म्हणाले की, ‘ मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप व नवोदय परिक्षांसाठी अहोरात्र मेहनत घेतली तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास केला तसेच ममुराबादला सेमी इंग्रजी वर्ग काढून ऐतिहासिक काम केले.’ निवृत्त शिक्षक विजय लुल्हे म्हणाले की,’ अविनाश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत शालेय भौतिक सुधारणा पालक संपर्कातून व सहकारी शिक्षक भगिनींच्या सहकार्याने शाळेचा सर्वार्थाने नावलौकीक वाढविला.मोरे सरांच्या गौरवार्थ आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे ( ग्रेडेड मुख्याध्यापक पिलखेडे ) कविराज राजीव वानखेडे,उषा सोनार, संदिप पवार, उल्हास पाटील, माध्यमिक शिक्षक व्हि.पी.सरोदे , वैशाली मोरे मॅडम, सहकारी सारिका बधान यांनी मनोगत व्यक्त केले. सदरहू शिक्षण परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप यांनी निपुण भारत अंतर्गत व केंद्रप्रमुख भगवान वाघे यांनी जीवन कौशल्ये – भावभावनांचे व्यवस्थापन व शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.तत्पूर्वी शासकीय परिपत्रकांचे वाचन झाले.
सत्काराला उत्तर देतांना मुख्याध्यापक अविनाश मोरे म्हणाले की,’ शिक्षकी पेशात ज्ञानदान करुन विद्यार्थी घडविले तसेच आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत केली. प्रशासकीय कामानंतर मिळालेल्या वेळात कलोपासना केली. पत्नी वंदनाने दुःखात समर्थ साथ दिल्याने जीवन सार्थकी झाले .कोविड काळात सुकन्या मृणाल व जावई यांच्या सेवेमुळे आणी विद्यार्थ्यांच्या दुवा तसेच आप्तेष्ट अन् मित्रांच्या शुभेच्छांमुळे जीवदान मिळाले.आता उर्वरीत आयुष्य समाजसेवा व कलोपासनेत सार्थकी लावण्याचा निश्चय मोरे यांनी व्यक्त केला त्यावेळी त्यांना गहीवरून आले.
केंद्रानंतर त्यांना विविध संस्थातर्फे अनुक्रमे सन्मानित करण्यात आले – ऑक्सफर्ड स्कुल आव्हाणे, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव, जि . उच्च प्राथमिक शाळा,पिलखेडे
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरती चौधरी व सहकारी भगिनींच्या सहकार्याने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून केंद्रातील शिक्षिका भगिनींना भेटवस्तू भेट देवून सन्मानित केले आणि अखंड सौभाग्य मिळो म्हणून निर्मिकाला प्रार्थना केली . पदवीधर विधानसभेच्या उमेदवार तथा महाराष्ट्र टिचर्स असोशिएशनच्या संस्थापक राज्याध्यक्ष शुभांगी पाटील ( सुर्यवंशी ) यांनी प्रचारार्थ भेट दिली . मला भरघोस मतांनी निवडून देऊन सेवेची संधी द्या म्हणून शिक्षक बंधु भगिनींना विनम्र आवाहन केले . तत्पूर्वी केंद्रप्रमुख वाघे यांनी शुभांगी मॅडम यांचे केंद्रातर्फे स्वागत केले.याप्रसंगी उपस्थितांना मॅडम यांनी नुतन वर्षाची दिनदर्शिका सप्रेम भेट दिल्या.निरोप समारंभानंतर अनेक शिक्षक भगिनींनी नतमस्तक होऊन शुभाशिर्वाद घेतले.शिक्षक बांधवांनी गळाभेट घेत निवृत्तीनंतर निरामय ,निरोगी दिर्घायुष्य लाभो या शुभकामना दिल्या त्यावेळी जयसिंग राठोड हे शिक्षक अविनाश दादा आम्ही तुमच्या मार्गदर्शन व सहवासला आता मुकलो सांगत गळ्यात पडून अक्षरशः लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडले तेव्हा अविनाश मोरे यांचाही अश्रूंचा बांध फुटला ! हा भावोत्कट प्रसंग पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले ! अविनाश सरांना निरोप द्यायला फुपनगरीहून चक्क एकाच घरातील तीन भगिनी गायत्री चौधरी,नंदिनी चौधरी व सोनल चौधरी उपस्थित होत्या ! कार्यक्रमास असोदा केंद्रातर्गत सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सहकारी आरती चौधरी,कल्पना चौधरी, हेमलता जैस्वाल, सारिका बधान, स्वाती पाटील, प्रिती चौधरी, ज्योती महाजन, पुनम शिंपी यांनी अमूल्य सहकार्य केले. सुत्रसंचालन कल्पना चौधरी व आभार प्रदर्शन प्रिती चौधरी यांनी केले.