जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा! विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश

विधानसभेत नेमकं काय घडलं?

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आज विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. याबाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी  करण्याची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केली असून एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं गेलं, असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घर कोणी जाळली, याची चौकशी नको का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली.

त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिंसक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.