बहिणाबाईंच्या आसोद्यातील 10 कोटींच्या सुधारीत स्मारकाला मंजुरी

जळगाव – आसोदा येथे बहिणाबाईंच्या १० कोटींचा सुधारीत स्मारकाला मंजुरी, नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज देवस्थानास व भवानी माता मंदिर येथे पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटी अशा एकूण १५ कोटींच्या भरीव निधीस मंजुरी मिळाली आहे.

याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मारकाचा विषय अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याने लवकरच मार्गी लागणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री झाल्यापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या सुधारित स्मारकासाठी स्थानिक पातळीवर व मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणारच असे असोदेकरांना मंत्री पाटील आश्वासित केले होते.

त्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळधी व जळगाव दौऱ्यात सभेत स्मारकाच्या कामांना गती देण्याचे वचन दिले होते. ग्रामविकास मंत्री महाजन यांनी मंत्री पाटील यांच्या मागणीनुसार जून मध्ये झालेल्या डीपीडीसी बैठकीत एकमताने ठरावही करण्यात येवून शब्द पाळत निधी मंजूर केला.

खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा येथील स्मारकाचे काम रखडले होते. शासनाच्या नियोजन विभागाकडील २८ फेब्रुवारी २०१४ च्या पत्रान्वये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राष्ट्र पुरुष थोर व्यक्तीचे स्मारके व पुतळे यांचे बांधकाम करणे ही योजना २०१४-१५ पासून वगळण्यात आली होती. हा विषय शासन स्तरावर प्रलंबित होता. पालकमंत्री पाटील यांनी वेळेवेळी मंत्रालयात व स्थानिक स्तरावर बैठका घेतल्या होत्या.

पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत नशिराबाद येथील श्री झिपरूअण्णा महाराज समाधी मंदिर देवस्थान पर्यटन योजनेअंतर्गत विकास करणे, नशिराबाद येथील भवानी माता मंदिर येथे पर्यटन योजनेअंतर्गत विकास करणे, असोदा येथे कवित्री बहिणाबाई चौधरी परिसराच्या पर्यटनाअंतर्गत विकास कामे करणे अशा कामांसाठी १५ कोटींच्या कामांना पर्यटन विभागाकडून पालकमंत्री पाटील यांच्या मागणीनुसार मंत्री महाजन यांनी मान्यता दिली आहे. ४ कोटी ५० लाख निधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे.

“कवयित्री बहिणाबाई चौधरी समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खऱ्या अर्थाने समाज सुधारक होत्या. मंत्री झालो आणि बहिणाबाईंच्या आसोदेकरांच्या स्वप्नातील स्मारकासाठी प्रयत्न करीत होतो. आता त्याला यश येतेय, बहिणाबाईंच्या सुधारित स्मारकासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.”

jalgaonsandesh

jalgaonsandesh