खळबळजनक;अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

अमळनेर-:अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत, गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील निंभोरा येथील तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला आरोपीपासून मुलगा झाला असून तिने मुलाचा परित्याग केल्याने बाळाला महिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी नववीला असताना, तू मला आवडते, आपण लग्न करू, दोघे पळून जाऊ, असे सांगितले. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे, असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने, तू माझ्याशी प्रेमसंबंध कर, अन्यथा तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरून मुलीने ‘हो’ म्हटल्यावर समाधान हा पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

हे प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर, त्यांनी मुलीचा साखरपुडा २६ जुलै, २०१२ रोजी एका तरूणासोबत करून दिला. ती १८ वर्षांची झाल्यानंतर लग्न करण्यात येणार होते.

परंतू ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याचे सांगीतले. यानंतर अवघ्या सात महिन्यांची गर्भवती असताना तिची प्रसूती झाली. पीडित तरुणीने जन्माला आलेले बाळ जवळ ठेवायचे नसल्याने, बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. मारवड पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार, समाधान पारधी यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत.