जळगाव- जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल निर्मितीवर चर्चेसाठी आयोजित बैठकीत आज आमदार गिरीश महाजन विलंबाने सहभागी झाले . आधी त्यांच्या येण्याबद्दल कुणीच काही सांगू शकत नव्हते त्यामुळे वेगवेगळ्या कंगोऱ्यांच्या चर्चेने तर्कवितर्क लावले जात होते.
जिल्हा बँक निवडणुकीच्या बिनविरोध निवडीसंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा यांची संयुक्त बैठक अजिंठा विश्रामगृह येथे बोलवण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले परंतु भाजपाचे नेते गिरीश महाजन हे या बैठकीला लवकर आले नाही, त्यांचे प्रतिनिधीदेखील बैठकीला उपस्थित न राहिल्याने जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार याची शक्यता धूसर झाली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा नेते हे स्वतंत्र पॅनल देणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते .
आजच्या सर्व पक्षीय बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्याने सर्व पक्षीय पॅनलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर, तसेच या पॅनलचे नेतृत्व करणारे ना. गुलाबराव पाटील, माजी आ.डॉ.सतीश पाटील , आ. चिमणराव पाटील, आ, किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे माजी खासदार डॉ उल्हास पाटील, डी.जे.पाटील, उदय पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील ,संजय गरुड असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत .
जिल्हा भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून सर्वपक्षीय बैठकीचे मला निमंत्रण आले होते. ही बैठक संपल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलतो अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री तथा भाजपचे आ. गिरीश महाजन यांनी दिली. गिरीश महाजन यांना येण्यास अर्धा ते पाऊणतास विलंब झाल्याने ही बँकेसंदर्भातील बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरु झाली. गिरीश महाजन यांच्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हेही या बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत बऱ्याच कालावधीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत एकनाथराव खडसे यांच्या अगदी शेजारी गिरीश महाजन बसलेले पाहून राजकीय कोपरखळ्यांचीही उत्सुकता वाढली होती. या बैठकीत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय संचालक मंडळात जिल्ह्यातून कोणत्या पक्षाला किती संचालक संख्या मिळेल. आणि कोणत्या नावांना संचालक म्हणून संमत्ती मिळेल. याची उत्सुकता जिल्ह्याला आहे.
काही दिवसांपूर्वी आम्ही स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक लढवू अशी जाहीर भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली होती आणि आज गिरीश महाजन यांना यायला विलंब होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र ते आल्यानंतर परिस्थिती निवळली होती. आता बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे काय भूमिका जाहीर करतात याची उत्सुकता जिल्ह्यात वाढली आहे.