माणुसकीला काळीमा… मुंबईत 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार, नराधमाला अटक

मुंबई-:बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. वरळी पोलीस स्थानकात चिमुकलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षी व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेच्या आईनं नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे वरळी पोलीस आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहेत. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती, तेव्हा आरोपीनं मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, त्यामुळे आईला संशय आला. आई तात्काळ मुलीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली, तेव्हा डॉक्टरांनी चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं सांगितलं. मुलीच्या आईनं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि सदर आरोपीला अटक केली.