शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत ! आता यादी येणार की नाही ?

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर –                        महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची पहिला यादी जाहीर केली त्यामुळे ज्यांचे नाव या अनुदान यादीत होते त्यांची दिवाळी आनंदाची आणि गोड झाली मात्र अनुदान मिळेल परंतु यादीत नाव नाही अशा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आणि कडू झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने नि‌यमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान यादी जाहीर केली .एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल या आशेने सर्व शेतकरी अनुदान यादीची वाट पाहत होते मात्र पहिली यादी जाहीर करण्यात आली आपले नाव यादीत आहे का पाहण्यासाठी गोंधळ उडाला .ज्यांची नावे होती त्यांनी ई केवायसी करण्यास सुरुवात केली मात्र आज न उद्या यादी येईल आणि आपल्याला अनुदान मिळेल या आशेने बरेच शेतकरी विविध कार्यकारी सोसायटी च्या कार्यालयात फेऱ्या मारताना दिसले .आता मात्र अनुदान यादी चा विषय कुठेही दिसत नाही वर्तमानपत्रात छापून येत नाही की दुरदर्शन वर माहिती येत नाही त्यामुळे दुसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले नसून हवालदिल झाले आहेत. एकाच वेळी सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे गरजेचे होते मग पहिली यादी , दुसरी यादी ,तिसरी यादी त्यानंतर मयत शेतकऱ्यांची यादी एवढी उठाठेव करण्याची गरज काय ? असा प्रश्न विचारला जात आहे.या पहिल्या , दुसऱ्या यादीमुळे विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व सचिव यांना शेतकऱ्यांना उत्तरे देण्यास सामोरे जावे लागत आहे.काहींनी तर तोंडे पाहून यादी पाठवली की काय ? असे ही विचारले त्यामुळे शासनाने जास्त विलंब न करता शेतकऱ्यांची अनुदान यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी मागणी केली जात आहे.