मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधात आता अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा गुन्हा आव्हाडांकडून नव्हे तर दुसऱ्याचं एका व्यक्तीनं दाखल केल्यानं या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, शिवा जगताप नामक एका २९ वर्षीय बांधकाम व्यावसायिक तरुणानं आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन संबंधित महिलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण दलित असल्यानं या महिलेनं आपल्याला मंदिरात जाण्यापासून रोखल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार तरुण शिवा जगताप याच्या म्हणण्यानुसार, २६ ऑक्टोबर रोजी तो मुंब्रा देवी मंदिराजवळ बांधकामाच्या कामाची पाहणी करायला गेला होता. यावेळी संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या सिकंदर खान या दोघांनी त्याला थांबवलं आणि तो दलित असल्याचं सांगत त्याला मंदिरात जाऊ दिलं नाही, तसेच तिथून निघून जाण्यास भाग पाडलं. त्यानंतर काल कळव्यात उड्डाण पूलाच्या उद्घाटनावेळी ही महिला त्या तरुणाला भेटली आणि तिनं शिवा जगताप याला शिविगाळ केली असं त्यानं म्हटलं आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी शिवा जगताप यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला.